Tuesday, December 23, 2025

कितना हसीन चेहरा : hasin chehara


काही चेहरे असे असतात की एकदा नजरेस पडले की मनात कायमचे घर करतात. ते केवळ सौंदर्यामुळे नाही, तर त्यांच्यात दडलेल्या निरागसतेमुळे, स्वभावामुळे किंवा कधी कधी फक्त एका हास्यामुळे. राहुलसाठीही तोच क्षण होता, जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा पाहिलं. त्याच्या मनात एकच ओळ घुमू लागली,

“कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें…”
राहुल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये उभा होता. संध्याकाळचं ऊन लालसर झालं होतं. झाडांच्या पानांवरून पडणाऱ्या सोनेरी किरणांनी कॅम्पस उजळून निघाला होता. राहुलच्या आयुष्यात तो क्षण आला. हातात मोबाईल, कानात हेडफोन, मनात प्लेलिस्ट वाजत होतं...थोडं प्रेम, थोडं काव्य, थोडं स्वप्न. आणि तेव्हाच त्यानं तिला पाहिलं. मित्रांच्या गप्पांमध्ये राहुल मग्न असतानाच त्याची नजर मात्र कॅन्टीनच्या दिशेकडे वळली. तिचं स्मित जणू ओळखीचं, पण तरीही नवखं. जणू फेबुकवर स्क्रोल करताना एखादं चित्र थांबतं आणि स्क्रीन काही क्षणांसाठी श्वास घ्यायला विसरते. पांढऱ्या रंगाचा साधा ड्रेस, हातात दोन-तीन पुस्तकं आणि हलक्या वाऱ्यावर झुळझुळणारे केस. ती चालत होती शांतपणे, पण तिच्या डोळ्यांत काहीतरी वेगळंच होतं. राहुलच्या मनाला आणि जगाला एकदम थांबवून टाकणारं. त्या क्षणी राहुलच्या प्लेलिस्टमध्ये एक जुनं गाणं वाजत होतं. त्याच्या मनात पहिल्याच क्षणी गाण्याची ओळ उमटली:
“कुदरत ने बनाया होगा फुरसत से तुम्हें, मेरे यार…”
राहुलला वाटलं, जणू संपूर्ण जग तिच्या चेहऱ्यावर स्थिरावलं आहे. मित्र काय बोलत आहेत, काय मस्करी करत आहेत त्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. त्याला फक्त त्याच्या डोळ्यासमोर तीच दिसत होती. तिचं येणं, तिचं चालणं, तिची नजर आणि तिचं सौंदर्य...तिची प्रत्येक गोष्ट त्याच्या मनात कोरत होती. ती दुसरीतिसरी कोण नव्हती तर ती होती नेहा...
त्या दिवसानंतर राहुल रोज कॅम्पसमध्ये आल्यावर तिच्या येण्याकडे डोळे लावून बसायचा. तिला पाहण्यासाठी अधीर झालेला असायचा. कधी लायब्ररीत, कधी कॅन्टीनमध्ये, तर कधी कॉलेजच्या गेटवरून जाताना. पण बोलण्याची हिंमत होत नव्हती. त्याला फक्त तिच्या असण्याची ओढ होती.
तो स्वतःला समजावत राहिला. “हे फक्त एक आकर्षण आहे, काही दिवसांत निघून जाईल.”
पण आतला आवाज त्याला वेगळेच काही सांगत होता. तिला पाहणं हे आकर्षण नाही तर ती एक वेगळी ओढ आहे. आता तो कविता लिहू लागला, प्रत्येक कवितेच्या सुरुवातीला त्याचं गाण्याची ओळ आपसूकच यायची...
“कितना हसीन चेहरा…”
एक दिवशी अचानक पाऊस आला. सर्व जण कॉलेजच्या कॅन्टीनसमोर धावत आले. राहुलही धावत आला आणि तेव्हाच त्याच्या बाजूलाच ती उभी होती. तिच्या केसांतून पाणी ओघळत होतं. डोळ्यांत थोडासा भिजल्याचा आनंद दिसत होता.
तिनं राहुलकडे पाहून स्मित केलं. तो क्षण राहुलच्या आयुष्यातला सर्वात वेगळा होता. जिच्याकडे रोज पाहात होता ती आता त्याच्या शेजारी उभी होती. मन अधीरही झालं होतं आणि हृदयातली धाकधूकही वाढली होती. पुन्हा त्याला ती गाण्याची ओळ आठवली "कितनी प्यारी आंखें…"
राहुल बॅचलर ऑफ मीडियामध्ये शिकत होता. कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये जग बघायला त्याला आवडायचं, पण लोकांच्या चेहऱ्यातून कथा शोधायला तो अजून शिकत होता. नेहाने फाईन आर्ट्स घेतलं होत. तिच्या Instagram वर प्रत्येक पोस्ट रंगांनी भरलेली. कॅप्शन्समध्ये डेप्थ आणि स्टोरीमध्ये सॉफ्ट फिल्टर. पण तीच खऱ्या अर्थानं “unfiltered” होती, जेव्हा ती हसत असे.
कॉलेजच्या एका प्रोजेक्टमुळे राहुल आणि नेहा दोघं एका ग्रुपमध्ये आले.
“हाय, मी नेहा,” ती म्हणाली.
“हाय… राहुल,” त्यानं थोडं अडखळत उत्तर दिलं.
सुरुवातीच्या awkward silence नंतर, हळूहळू एक rhythm तयार झाला. रिल्स, असायमेंट्स, मिम्स आणि रात्रीचे 2 वाजताचे चॅट मेसेज.
नेहा मेसेज पाठवायची.
"तू झोपला नाहीस अजून?"
तो म्हणायचा, "झोपणारच होतो, पण चॅट नोटिफिकेशन दिसली आणि पुन्हा पाहिली." त्याच्या जगातला आता “do not disturb” mode बंद झाला होता.
त्यानंतर त्यांच्या भेटी वाढू लागल्या. ग्रुप वर्क, नोट्स शेअर करणं, छोट्या गप्पा… सगळं काही सहज घडत होतं. राहुलच्या मनात मात्र दरवेळी तेच गाणं घुमत होतं... कितना हसीन चेहरा
एकदा कॉलेजमधल्या पावसाळी सायंकाळी दोघेही कॅन्टीनच्या छताखाली उभे होते. बाहेर धुकं आणि आत कॉफीचा सुगंद. नेहाने हात पुढे करून पावसाचे थेंब पकडले. तिच्या बोटांवरून पाणी गळत राहिलं आणि राहुल त्या दृश्यात हरवला. त्याला वाटलं, प्रेम असं काहीसं असतं. ज्याचं नाव ठेवायचं नसतं आणि ज्या क्षणाला थांबवायचं नसतं. नेहा मात्र शांत होती.
ती हसत म्हणाली, "तू फोटो घेतोस ना छान? एक क्लिक कर."
राहुलनं कॅमेरा काढला, पण लेन्सच्या मागे त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडेच होतं. त्या फ्रेममध्ये केवळ तिचा चेहरा नव्हता तिचं निरागस चेहरा, सौंदर्य कैद झालं. त्या रात्री त्याच्या डायरीत पहिली ओळ उमटली.
'कितना हसीन चेहरा'
हळूहळू राहुल आणि नेहा चांगले मित्र झाले. नेहाला राहुलचं शांत स्वभाव, विनोदबुद्धी आणि समजूतदारपणा आवडायला लागला. ती त्याच्याशी बिनधास्त बोलायची, आपली स्वप्नं सांगायला लागली.
एकदा ती म्हणाली,'मला ट्रॅव्हल खूप आवडतं. डोंगर, समुद्र, जुन्या गल्ल्या… माणसांना आणि ठिकाणांना जाणून घ्यायला मला खूप आवडतं.”
राहुल हसत म्हणाला, “मग तुला लिहायला सुरुवात करायला हवी. तू लिहिलंस तर लोक वाचतच राहतील.”
त्या क्षणी नेहा काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात राहुलसाठी वेगळं काहीतरी झळकत होतं.
पण प्रत्येक नातं इतकं साधं, सरळ नसतं. एके दिवशी राहुलनं कॅम्पसमध्ये नेहाला दुसऱ्या मुलासोबत बोलताना पाहिलं. ते हसत होते, खूपच मोकळेपणाने. राहुलच्या मनात शंका आली. त्याला वाटलं, कदाचित नेहासाठी तो फक्त एक मित्र आहे. त्याच्या मनातली ओळख फक्त त्याच्या कल्पनेपुरती मर्यादित आहे.
त्या रात्री त्याच्या डायरीत त्यानं लिहिलं, “कितना हसीन चेहरा, लेकिन शायद मेरे लिए नहीं…”. त्या रात्री राहुलचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. सतत नेहा आणि तिच्या मित्राचा चेहरा नजरेसमोर येत होता. मध्येच नेहा आणि त्यांच्या भेटीगाठी आठवत होत्या.
काही दिवस राहुल नेहापासून दूर राहिला. नेहाच्या नजरेतून त्याचं वागणं सुटलं नाही. राहुलमधील वेगळेपण तिला जाणवलं. नेहा राहुलपेक्षा धीट होती. तिनं थेट त्याला विचारलं. “राहुल, तू एवढा गप्प का झालास?”
नेहाच्या प्रश्नाने राहुल भानावर आलाय. राहुलनं मनातील शंका सांगितली. नेहाने थोडं हसून सांगितलं.
“तो माझा चुलत भाऊ आहे. माझ्या आयुष्यात जर कुणी महत्त्वाचं असेल, तर तो तू आहेस. अन्य कुणी नाही. तुला कळलं नाही का अजून?”
नेहाच्या उत्तराने राहुल गप्प झाला. पण त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याक्षणी त्याला जाणवलं, की प्रेम नेहमी शंकेवर नाही, तर विश्वासावर असतं.
त्या दिवशी राहुलनं धैर्य एकवटलं आणि नेहाच्या डोळ्यांत बघून म्हणाला,
“नेहा… मी खूप दिवसांपासून तुला काही सांगायचं होतं. जेव्हा पहिल्यांदा तुला पाहिलं, तेव्हा एकच ओळ मनात आली,
‘कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें…’. तू माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहेस.” नेहाने राहुलचा हात घट्ट धरला. तिच्या डोळ्यांतही पाणी आलं.
दोघं आता एकत्र होते, पण दोघंही आपापल्या स्वप्नांच्या मागे धावत होते. नेहानं तिचं YouTube art channel सुरू केलं. राहुल documentary film बनवू लागला. दोघं विचारांमध्ये वेगळे, पण भावनांमध्ये एकसारखे. त्यांनी प्रेमाला "I love you" मध्ये न बांधता “you matter” मध्ये जपलं.
रात्री झोपताना एकमेकांना मेसेज करत.
“आज तू स्वतःसाठी काय केलंस?”
त्या प्रश्नांत काळजी होती आणि भविष्याचं खरे प्रेमही.
काही वर्षांनी दोघं पुन्हा त्या कॉलेज कॅम्पसमध्ये परत आले. Alumni Meet साठी. ती आता प्रसिद्ध digital artist होती आणि तो short film director. त्यांनी जुनी कॅन्टीन पाहिली. तोच पाऊस, तोच बेंच आणि playlist मध्ये पुन्हा तेच गाणं वाजलं. राहुल हसून म्हणाला,
"हे गाणं आपल्याला अजून जपायचं आहे."
ती हसून उत्तरली,
"ते आता आपल्या आयुष्याचा background score आहे. "त्या क्षणी दोघांनाही उमगलं.
प्रेम म्हणजे ‘हातात हात घेणं’ नाही, तर ‘वेळ जसजसा बदलतो, तसतसा एकमेकांमध्ये नवे अर्थ सापडणं’.
राहुल आणि नेहा यांची कहाणी सुरू झाली त्या गाण्याने आणि आता ते दोघे एकत्र बसून ते गाणं ऐकायचे. प्रत्येक वेळी राहुलच्या मनात तोच विचार यायचा...“कुदरत ने खरंच फुरसत काढून तुला बनवलं आहे.”
राहुल आणि नेहाची प्रेमकथा गाण्याने सुरू झाली. तीच प्रेमकथा आयुष्यभरासाठी त्यांचं गाणं बनली.
कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आखे....



No comments:

Post a Comment