काही चेहरे असे असतात की एकदा नजरेस पडले की मनात कायमचे घर करतात. ते केवळ सौंदर्यामुळे नाही, तर त्यांच्यात दडलेल्या निरागसतेमुळे, स्वभावामुळे किंवा कधी कधी फक्त एका हास्यामुळे. राहुलसाठीही तोच क्षण होता, जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा पाहिलं. त्याच्या मनात एकच ओळ घुमू लागली,
THE BEYOND LOVE
Tuesday, December 23, 2025
कितना हसीन चेहरा : hasin chehara
काही चेहरे असे असतात की एकदा नजरेस पडले की मनात कायमचे घर करतात. ते केवळ सौंदर्यामुळे नाही, तर त्यांच्यात दडलेल्या निरागसतेमुळे, स्वभावामुळे किंवा कधी कधी फक्त एका हास्यामुळे. राहुलसाठीही तोच क्षण होता, जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा पाहिलं. त्याच्या मनात एकच ओळ घुमू लागली,
local love story : लोकलमधलं प्रेम
सकाळची धावपळ सुरू होती. लोकल पकडण्यासाठी माणसं धावत होती. सकाळी 8.27ची विरार-चर्चगेट लोकल लागली होती. जागा मिळवण्यासाठी प्रवासी गर्दीत चिरत होते. लोकलने हॉर्न दिला...लोकल खचाखच भरली होती. चला, घुसा, धक्का मार, बाजूला हो...प्रवाशांचे आवाज वाढले होते. याच लोकलमध्ये दोन जण शांतपणे बसले होते...अगदी समोरासमोर.
ओम. इंजिनियरिंग पूर्ण झालेल, मात्र मनानं खूप introvert. शांत आणि एकाकीपणा पसंत असलेला. तर इशिता...गोरी, सुंदर आणि प्रेमळ स्वभावाची... ती डिजाईन स्टुडिओमध्ये इंटर्न. कानात AirPods आणि हातात फाईल्स घेऊन बसली होती. ती नेहमी कलेच्या विश्वात रमलेली, पण मनात सतत कशाची ना कशाची चिंता.
विरार लोकलचा चर्चगेट प्रवास सुरू झाला...एक एक स्टेशन मागे जात होतं. काही प्रवासी इच्छीत स्टेशनवर उतरत होते तर काही जण लोकलमध्ये चढत होते. लोकलचा वेग वाढला होता, मात्र अचानक मोटरमननं ब्रेक मारला. प्रवाशांना झटका बसला. त्याच वेळी इशिताच्या हातातील स्केच बूक खाली पडलं. समोरच बसलेल्या ओमने ते उचललं आणि इशिताकडे दिलं. ओम काही सेकंद तिच्याकडे पाहात राहिला.
इशिताने स्माईल दिलं आणि नजरेनेच थँक्स म्हणाली. ओम काहीच बोलत नाही. त्या क्षणी दोघांनी काही म्हटलं नाही, पण लोकलच्या आवाजात नजरेचा एक शांत संवाद झाला.
आता हे रोजचं झालं होतं. इशिताचं ऑफिस चर्चगेटला होतं. ती लोकलच्या प्रवासात स्केच काढत असे. तर ओम पुस्तक किंवा लॅपटॉपमध्ये मग्न असे. असं असलं तरी मध्येच कधी तरी त्यांचे डोळे बोलत असत. ओम आणि इशितामध्ये एक मूक आणि delicate नातं तयार झालं होतं.
एका दिवशी इशिता आली नाही. दुसऱ्या दिवशीही नाही. आता आठवडा झाला...इशिता लोकलमध्ये आली नाही. ओमला तिची चिंता वाटू लागली. तोही तिची वाट पाहत बसलेला असे. त्याच सीटवर...
“काही झालं असेल का? मोकळेपणाने बोलली असती तर कळलं असतं… पण आपल्यात काही नातं नसताना मी किती विचार करावा?” असं ओमला वाटू लागलं.
मात्र 8 दिवसांनी इशिता लोकलमध्ये आली. तीही वांद्रे स्टेशनवर. थकलेली. भागलेली. तिला पाहताच ओमने विचारलं.
“तू… ठीक आहेस ना? 8 दिवस झाले… दिसली नाहीस.”
इशिता म्हणाली, “तब्येत बरी नव्हती आणि आज इंटरव्ह्यू होता. टेन्शनमुळे खूप पॅनिक झाली होती .”
ओमची चिंता वाढली...त्याने पुन्हा इशिताकडे पाहिलं आणि म्हणाला
'मला काही कळलंच नाही'
इशिता आणि ओममधला हा पहिला emotional connect होता.
लोकलला उशीर झाल्यामुळे गर्दी वाढली होती. जो तो अंधर चलो, धक्का मारो असं बोंबलत होता. धकाबुक्की सुरू झाली. एवढ्यात मागून कुणी तरी जोरदार धक्का मारला आणि इशिताचा तोल गेला. इशिता पडणार इतक्यात ओम तिला दोन हातांनी पकडतो.
इशिता ओमकडे पाहते. तिला थोडी असुरक्षितता वाटली, मात्र ती ओमला थँकू म्हणाली. पहिल्यांदा तिने त्याचं नाव घेतलं. ओमलाही जरा बरं वाटलं.
ओम आणि इशिता आता जवळ येऊ लागले होते. काही दिवसांमध्ये ते लोकलबाहेरही एकमेकांना भेटायला लागले. मरिन ड्राइव्हच्या कट्ट्यावर ते बसले होते. दोघांनीही इतरांचं भान नव्हतं. मात्रांचा लाटांचा आवाज गुंज घालत होता. इतक्यात इशिता बोलली,
'लोकल नसती तर आपण भेटलो असतो का?'
'नाही.' ओम हलकं हसत म्हणाला.
'पण काही भेटी intentional नसतात… त्या universe arrange करतं.'
इशिताने स्माईल केली. तिच्या डोळ्यांमधले भाव बदलले. ती ओमकडे शांत पण एकटक पाहू लागली. संध्याकाळची रात्र कधी झाली ते कळलंच नाही. दोघेही घराकडे निघाले. नेहमीचाच लोकलचा डबा पकडायचा हे दोघांनी ठरवलं. चर्चगेट स्थानकात लोकल लागली होतीच. काहीच सेंकदांमध्ये लोकल चर्चगेट स्थानक सोडणार होती. ओम आणि इशिता यांनी चालण्याचा वेग वाढवला. नेहमीच्या डब्याजवळ आली आणि नेमकी लोकल सुटली. इतर काही प्रवासी लोकल पकडायला धावत होते. इतक्यात एका प्रवाशाचा धक्का इशिताला लागला. इशिताचा तोल गेला. काही क्षणात ती लोकलच्या दोन डब्यांच्या गॅपमध्ये येणार..इतक्यात ती जोरात ओरडली...
'ओम...वाचव'
इशिताच्या ओरडली तसं ओमने झटक मागे वळून पाहिलं. क्षणाचाही विलंब न लावता ओमने इशिताचा हात पकडला आणि तिला खेचलं. ही घटना इतक्या वेगात झाली की ओम प्लॅटफॉर्मवर पडला आणि इशिता त्याच्यावर...लोकलने वेग पकडला...प्रवाशांनी वाचली म्हणत सुस्कारा सोडला...मात्र इशिता ओमकडे पाहात राहिली...ओमने सावरलं..दोघंही उभी राहिली...माझं काय झालं असतं या विचारातून इशिता अद्याप बाहेर आली नव्हती. तिने ओमला बिलगूनच उभी होती.
'मी आहे… बस. काही नाही होणार.' ओम बोलला.
इशिताच्या हृदयाची वाढलेली धडधड आता कमी झाली होती. इशिता ओमच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत उभी होती.
हाच क्षण दोघांसाठी टर्निंग पॉईंट ठरला.
“ओम… तू आला नसतास तर… मी—”
ओम तिचा हात धरतो.
“बस. काही बोलू नकोस. तू सेफ आहेस… ते महत्वाचं.”
ती त्याच्या हातात हात गुंफते. शांत, उबदार, जिव्हाळ्याचा क्षण.
त्या दिवसांनंतर इशिता ओमशिवाय लोकल पकडत नाही.
ते एकत्र बसतात, एकत्र हसतात, एकत्र कामाला जातात आणि नंतर एकत्रच चहा घेतात.
गर्दीतली शांतता, धक्काबुक्कीतील जवळीक, वेळेतील लय,
झोपाळकी वारा,आणि त्यांच्या प्रेमाचा नाद वेगळंच सांगून जात होता...लोकलमधलं प्रेम हे फक्त प्रेम नव्हतं…
हे दोन एकाकी, शांत, प्रेमीयुगुलाचं healing होतं.
Tuesday, October 7, 2025
LOVE STORY : पहिलं प्रेम
मुंबईची लाईफलाईन नेहमीच्या गमज्यात चालली होती. दुपारीची वेळ होती. खिडकीच्या बाजूला बसलेला आदित्य त्याच्या फोनवर नोट्स वाचत होता. ऑफिसच्या प्रोजेक्टचा ताण त्याच्या कपाळावर ठसठशीत रेषा काढून गेला होता. मुंबईत येऊन आदित्यला दोन वर्षे झाली होती. महानगराच्या वेगवान जीवनाशी अजून तडजोड सुरूच होती. एकटेपणा हा त्याचा जोडीदार होता.
आदित्य बोरिवली स्टेशनवर उतरला. स्टेशनवरून छोट्याशा फ्लॅटकडे चालत निघाला. रस्त्यावर गर्दी. हॉर्नचा कर्कश आवाज. दुकानांमधून येणारा विविध खाद्यपदार्थांचा वास... हे सगळं त्याला अजून परकंच वाटत होतं. चालता चालता तो नॅशनल पार्कजवळ पोहोचला. हळूच त्याचे पाय नॅशनल पार्कमध्ये वळले. तो तसाच पुढे चालत होता. तेवढ्यात त्याचे लक्ष एका कोरीव आकृतीकडे गेले. उद्यानातील एका बेंचवर एक तरुणी बसलेली होती. तिच्या हातात स्केचबुक होती. ती अत्यंत एकाग्रतेने काहीतरी रेखाटत होती. तिचे लांब केस वाऱ्यावर लहरत होते. नॅशनल पार्कमधील प्रकाशाने तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेजस्वी छटा निर्माण झाली होती.
आदित्य थांबला. काहीतरी अनोखं, काहीतरी मोहक दिसत होतं. ती मुलगी पेन्सिलीने स्केच रेखाटत होती. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची एकाग्रता, डोळ्यातील सर्जनशीलता जाणवत होती... हे सगळं बघून आदित्य विस्मयाने थक्क झाला. तो स्वत:ला विचार करू लागला, "हे काय आहे? असं तर मी आजपर्यंत कधीच अनुभवलं नाही. पाहिलं नाही. जणू काही माझं हृदयच थांबून गेलंय." ही भावना त्याला अपरिचित होती. तो पुढे चालत राहिला पण त्या मुलगीचे चित्र त्याच्या डोळ्यांमध्ये कोरलं गेल.
दुसऱ्या दिवसापासून नॅशनल पार्क आदित्यच्या दिनक्रमाचा एक भाग बनले. तो जाणूनबुजून त्या वेळी ऑफिसमधून निघे, जेणेकरून त्या बेंचकडे जाताना त्या कलाकार मुलीला बघू शकेल. कधी ती स्केच रेखाटत असे, तर कधी फक्त बसून झाडांना, ढगांना न्याहाळत असे. आदित्यला तिचं नावही माहिती नव्हतं, पण तिच्या उपस्थितीने त्याच्या एकाकी जीवनात एक नवीनच रंग भरला होता.
एके दिवशी तो बेंचजवळ पोहोचला. एवढ्यात थोडा जोराचा वारा आला. तिची स्केचबुक वाऱ्याने उडाली आणि ती एका झाडाच्या फांदीवर अडकली. ती मुलगी पाय उंच करून स्केचबुक काढण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते जमत नव्हतं. आदित्य झपझप पुढे आला. "मी काढून देऊ का?" म्हणत त्याने सहजतेने फांदीवरून स्केचबुक काढलं आणि तिला दिलं. तिने आदित्यकडे पाहिले. "ओह! खूप खूप धन्यवाद!" स्माईल देत ती म्हणाली.
"काही नाही. तुम्ही खूप सुंदर स्केच रेखाटता," तिच्या स्केचबुककडे बघत आदित्य म्हणाला. तिने एका वृद्धाचे अतिशय सूक्ष्म चित्र रेखाटलं होतं, ज्याच्या चेहऱ्यावर अनंत कथा कोरलेल्या दिसत होत्या.
"धन्यवाद. माझं नाव अनन्या आहे," ती हात पुढे करत म्हणाली. "मी आदित्य. तुम्ही इथं रोज येता का?" त्याने अन्यन्यला शेकहॅण्ड करता करता विचारले.
"होय. इथं शांतता वाटते आणि प्रकाशही छान असतो संध्याकाळी. स्केच रेखाटण्यासाठी परफेक्ट." अन्यन्या म्हणाली.
तेवढ्यात, एक फेरीवाला "चाय... गरमा गरम चाय..." असे ओरडत येताना दिसला.
आदित्यला एक कल्पना सुचली. "चहा पिऊ या का? मी म्हणजे..." तो थोडा अडखळतच बोलला.
अनन्यालाही हसू आलं. "हो, का बरं नाही?" ती म्हणाली.
अशा प्रकारे दोन कप गरम चहा घेऊन ते त्या बेंचवर बसले. दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. आदित्यला कळले की, अनन्या एक फ्रीलांस इलस्ट्रेटर आहे, जी पुस्तकांसाठी चित्रे काढते. तिला तिच्या कलेबद्दल खूप ओढ होती आणि ती मुंबईतल्या छोट्याशा खोलीत राहून स्वत:चा मार्ग शोधत होती.
"मुंबईत एकटीने राहणं सोपं नाही, नाही का?" आदित्य म्हणाला.
"नाही, पण इथं स्वातंत्र्य आहे आणि इथली ऊर्जा, ही गडबड... यातूनच नवनवीन कल्पना जन्माला येतात," अनन्या म्हणाली. तिचे डोळे चमकत होते. डोळ्यांमध्ये तेज होते.
तिचं उत्तर ऐकून आदित्यला आश्चर्य वाटलं. जे जीवन त्याला ओझं वाटत होतं, तेच अनन्यासाठी सर्जनाचं स्रोत होतं. तो म्हणाला, "खरंय. मी कधी तसं बघितलंच नाही. माझं जीवन फक्त ऑफिस आणि घर यातच सिमटून गेलंय."
"मग तुला बदल हवा आहे, आदित्य," अनन्या म्हणाली, एका अर्थपूर्ण नजरेने त्याच्याकडे बघत अनन्या पुन्हा म्हणाली, "जग बघण्याचा दृष्टिकोन बदलला की सगळंच बदललेलं दिसतं."
तेवढ्यात, आकाशात ढग गोळा झाले आणि पाऊस सुरु झाला. "छत! माझं स्केचबुक!" अनन्या ओरडली.
दोघेही एका मोठ्या झाडाखाली आश्रयासाठी धावले. झाडाची फांदी एक छतासारखी होती. पावसाच्या धारा त्यांच्या आजूबाजूला कोसळत होत्या, पण आदित्य आणि अनन्या भिजत नव्हते.
"वाह, इथं छान आहे, जगातल्या सगळ्या गडबडीपासून दूर," आपले केस हलके कुरवाळत अनन्या म्हणाली.
आदित्य तिला बघत होता. अनन्याच्या केसांमधून पावसाच्या थेंबांचा सुगंध येत होता. तो म्हणाला, "खरंच. इथं जग वेगळंच दिसतंय."
तेवढ्यात, अनन्या हसली. "हे बघ, इंद्रधनुष्य!"
आदित्यने बघितलं. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य उमटलं होतं. हा नजारा अप्रतिम होता. अनन्याने लगेच तिची स्केचबुक काढली आणि ते दृश्य रेखाटायला सुरुवात केली.
आदित्य तिला बघत राहिला. तिच्या हालचाली, तिची एकाग्रता... हे सगळं बघून त्याला जाणवलं की त्याच्या मनात काही तरी बदलत होतं आहे. तो म्हणाला, "अनन्या, मला काही तरी बोलायचं आहे..."
ती पेन्सिल थांबवून त्याच्याकडे बघत होती.
"मी तुला पहिल्यांदा त्या बेंचवर बघितलं तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो," आदित्य म्हणाला. "मला असं वाटलं की... देखा हैं पहिली बार, साजन ने आखों मे प्यार... जणू काही माझ्या आयुष्यातली सगळी रुंदी, सगळे रंग एकाच ठिकाणी एकवटलेत."
अनन्याचे गाल लाल झाले. ती हसली आणि म्हणाली, "आदित्य, हे खूप छान होतं."
"आणि मग," तो पुढे म्हणाला, "तेव्हा मला कळलं, की ये जिंदगी हमारी, बस इक पल की नही हैं... ये सदा के लिए हैं... हा क्षण, ही भावना, ही फक्त एक पल की नाही. हे कायमचं राहील."
पाऊस थांबला होता आणि सूर्याने पुन्हा दर्शन दिलं. अनन्या आदित्यच्या जवळ आली. "मला वाटतं," ती म्हणाली, "आपण दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलोय... आपल्या दोघांच्या हृदयांचा तार झंकारत आहे, प्रेमाने..."
तेवढ्यात, दूरवरून एक भजन मंडळीचा आवाज येऊ लागला. त्यांचा स्वर मधुर होता. "हो गया है इकरार... हां, हो गया है इकरार..."
हा आवाज संपूर्ण वातावरणात भरून राहिला होता. आदित्यने अनन्याचा हात हळूवारपणे धरला. "तू माझ्या जीवनात आलीस, माझं जग बदललं, अनन्या," तो म्हणाला, आणि हे फक्त क्षणभर नाही, हे कायमचं आहे."
अनन्याने त्याचा हात जोरात धरला. दोघांनाही हे जगा आणि जीवन सुंदर भासू लागलं. जीवनाचं मधुर संगीत ऐकू येऊ लागलं. ते झाडाखाली उभे राहिले, आणि इंद्रधनुष्याच्या छटा त्यांच्यावर पडत होत्या. त्यांच्या सभोवतालचं वातावरण जणू काही त्यांच्या प्रेमाने रंगून गेलं होतं. ते दोघंही एकमेकांच्या नजरेत नजर घालून पाहात होतं, अगदी एकरूप झाल्यासारखे.
त्यानंतरचे दिवस आदित्य आणि अनन्यासाठी एक नवीन जीवन सुरू झाले. आदित्यने अनन्यासोबत मुंबईच्या रस्त्यांवर फिरायला सुरुवात केली. तो तिला तिच्या स्केचिंग स्पॉट्सवर घेऊन जाऊ लागला. मरिन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. अनन्याने आदित्यला शहरातील सुंदर गोष्टी बघायला शिकवल्या. एका कोपऱ्यात उगवलेला फुलांचं झाड, एका जुन्या इमारतीवरचं नक्षीकाम, रस्त्यावरच्या एका फेरीवाल्याच्या चेहऱ्यावरील हसू.
एके रात्री ते जुहू बीचवर बसले होते. समुद्रकिनाऱ्यावर चांदण्यांचा प्रकाश पडला होता. शांत वातावरणात लाटांचा आवाज वाऱ्यासारखा गुंज घालत होता.
"मी कधीच समुद्राचं इतकं सुंदर रूप पाहिलं नव्हतं," आदित्य म्हणाला.
"ते कदाचित तू माझ्यासोबत बघितल्यामुळं असेल," अनन्या म्हणाली आणि तिनं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
"नक्कीच," तो म्हणाला. "तू मला शिकवलंस की जग बघण्यासाठी. हे सुंदर जग पाहण्यासाठी डोळे पुरेसे नाहीत, तर एक हृदयही हवं....सर्व काही साठवून ठेवण्यासाठी. ये जिंदगी हसीन है... हे खरं आहे."
अनन्या म्हणाली, "आणि तू मला शिकवलंस, की प्रेम केवळ भावनाच नसते तर तो एक करारही असतो. आपल्या दोघांच्या हृदयाचं मिलन..."
तेवढ्यात, दूरवरून कोणीतरी गिटार वाजवत होता आणि तोच गाण्याचा सूर गुंजत होता. "हो गया है इकरार... हां, हो गया है इकरार..."
हा सूर समुद्राच्या आवाजात विलीन झाला होता. आदित्यने अनन्याकडे पाहिलं. तिचे डोळे चांदण्यांसारखे चमकत होते. त्याने तिच्या हातात हात घातला आणि म्हणाला, "हे सगळं सुरुवातीपासूनच ठरवलं होतं, नाही का? त्या पहिल्या दिवशी, त्या उद्यानातल्या पहिल्या भेटीत."
"होय," अनन्या म्हणाली. फक्त आपल्याला ते कबूल करायला थोडं वेळ लागला."
ते समुद्रकिनाऱ्यावर चालत होते, त्यांच्या सावल्या एकरूप झाल्या. मुंबईची शहरी अंधारी रात्र आणि अथांग परसलेला समुद्र त्यांचं प्रेम एका सुंदर कथेप्रमाणे वाढत होतं.
अनन्याने त्याचा हात जोरात धरला. "काय विचार करतोयस?" तिने विचारले.
"मी विचार करतोय, तू माझीच आहेस कायमची" आदित्य म्हणाला.
"आणि तू माझ्यासाठी," अनन्या म्हणाली.
तेवढ्यात, आकाशात एक तारा कोसळला. अनन्या म्हणाली, 'वाह! शूटिंग स्टार! काही तरी इच्छा व्यक्त कर.'
आदित्यने डोळे मिटले. त्याने इच्छा केली की हा सुखद सहवास कायम राहावा. त्याने डोळे उघडले तेव्हा पाहतो, की अनन्या त्याच्याकडेच बघत होती.
"तू इच्छा व्यक्त केली का?" तिने विचारले.
"होय," तो म्हणाला. "पण मला वाटतं ती आधीच पूर्ण झाली आहे."
अन्यनाने स्माईल केलं. ते पुन्हा चालू लागले. समुद्राचा आवाज आणि दूरवरून येणारा गाण्याचा सूर त्यांच्या प्रेमकथेचा साऊंडट्रॅक बनला होता. "हो गया है इकरार..."
आदित्य आणि अन्यन्या आता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती आणि अन्यन्या आदित्यच्या कवेत होती.
Friday, July 26, 2024
पहिली नजर
प्रिय प्रेयसी
तो दिवस...तो चेहरा...ती भेदक आणि करारी नजर...हृदयाला घायाळ करणारं रूप, डोळ्यात साठवून ठेवणारं तुझं ते स्मित हास्य...ती पाहता कळिजा खलास व्हावा, असंच म्हणावं लागले...रुपच तुझं मस्ताना आहे की प्रेमात आकंठ बुडून जावं...पापण्यांना पापणी चिटकली तरी तू डोळ्यात दिसावी...इतकं लाजवाब सौंदर्य...परी म्हणू की अप्सरा, काहीच कळत नाही बघ...तुझा फुललेला चेहरा माझ्या कोमल हातात घेऊन बघत राहावं...तुझं सौंदर्य जणू प्याऊनच घ्यावं...पहिल्या नजरेत प्रेमात पडावं आणि पहिल्या भेटीतच प्रेमाची झालर डोळ्यात दिसावी. हृदयाला तर प्रेमाच्या उकळ्या फुटाव्यात आणि त्यात तुझं हृदयही खुदूखुदू नाचावं...
तुझी पहिली भेट हा साक्षात योगच होता...एकाद्या भ्रमराने फिरत राहावं, फिरत राहावं आणि कमळाच्या फुलावर अलगद विसावा घ्यावा...आणि त्या कमळाच्या पाकळ्यांनी भ्रमराला अलगद बाहुपाशात घ्यावं...तसंच काहीसं झालंय...तुझ्या प्रेमाच्या बाहुपाशात पूर्ण तसंच पडून राहावं असं वाटतंय. सूर्य उगवेल. दिवस होईल. कमळाच्या पाकळ्या उघडतील आणि भ्रमर उडून जाईल...असं होऊच नये असं वाटतंय. पहिलं प्रेम हे पहिलं प्रेमच राहावं...आणि पहिल्या नजरेत मी तुझ्या नाजूक नयनांमध्ये प्रेम आणि प्रेमच पाहिलं. सर्व निराशाच संपून गेली. प्रेमाने भरलेलं जग दिसू लागलं...गुलाबाच्या फुलाने जसा रुबाब दाखवावा तसाच तो तुझा रुबाब...कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे पापण्या आणि सागराचा अथांगपणाही मावावा असे ते तुझे डोळे...चाफेकळीने मान खाली घालावी असे चाफेकळी नाक, मखमलीने लाजावं असा मखमली चेहरा, वाऱ्यावर उडणारे भुरभुर केस...डोळ्यांवर ढळणारी बट...अप्रतिम सौंदर्याची खाण...अप्सरा आली आणि हृदयात बसली... असंच काहीस...जणू मंथरलेलं...स्वप्नवत...तुला माझ्या डोळ्यांच्या पापण्यांमध्ये बसवू की हृदयाच्या कप्प्यात...कशी काही ती चैनच पडत नाही...क्षणोक्षणी आठवणींचा चिंब पाऊस पडावा...आठवणींच्या पावसात पार भिजून जावं आणि तुझं गीत ओठी यावं...शब्द सुचू दे तुझे गीत गाण्यासाठी अशी आर्जवच करतो त्या विधात्याकडे...कारण तूच माझी जिगर आहेस आणि तूच माझी नजर आहेस...तूच माझे शब्द आहेत आणि तूच माझी कविता आहेस...कोणत्याही अलंकाराने नटलेली, सजलेली नसताना तू नमकीन आहेस... तुझ्या अदांवर मी कायम फिदा आहे...कारण या जीवनात तू माझी आणि माझीच हमसफर आहेस...हे वाचून बघ तुला प्रेमाचा गुलकंद आठवतो का...?
तुझाच दिल देऊन बसलेला प्रेयस



.png)